Pune | Thu, 14 May 2026

Ad

प्रशासन आणि उद्योगांत ‘एआय’ मुळे मोठे बदल- मुख्य सचिव राजेश अग्रवाल

Sunil Goyal | 8 views
प्रशासन आणि उद्योगांत ‘एआय’ मुळे मोठे बदल- मुख्य सचिव राजेश अग्रवाल

मुंबई, दि.२४ : भविष्यात ‘एआय’ केवळ माहिती प्रक्रिया करण्यापुरते मर्यादित न राहता प्रशासन, उद्योग आणि दैनंदिन जीवनात मोठा बदल घडवेल असे प्रतिपादन मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी केले.

भारतीय लोकप्रशासन संस्था, महाराष्ट्र प्रादेशिक शाखा आणि सामान्य प्रशासन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालय येथील परिषद सभागृहात स्व. श्री. बी. जी. देशमुख स्मृती व्याख्यान झाले. व्याख्यानाचा विषय कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) युगातील नागरिक सेवा असा होता.

यावेळी भारतीय लोकप्रशासन संस्था, महाराष्ट्र प्रादेशिक शाखेचे मानद अध्यक्ष माजी मुख्य सचिव आणि सार्वजनिक सेवा हक्क आयोगाचे माजी राज्य मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रिय, भारतीय लोकप्रशासन संस्था, नवी दिल्लीचे महासंचालक डॉ. सुरेंद्रकुमार बागडे, भारतीय लोकप्रशासन संस्था, महाराष्ट्र प्रादेशिक शाखेचे मानद कोषाध्यक्ष विकास विनायक देवधर, मुख्यमंत्री यांचे सचिव श्रीकर परदेशी यांच्यासह संस्थेचे सदस्य उपस्थित होते.

मुख्य सचिव राजेश अग्रवाल म्हणाले, ऊर्जा, डेटा सेंटर, क्लाउड आणि एआय या घटकांवर भर देत शासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक सुलभ करण्यासाठी एआय महत्त्वाची भूमिका बजावेल. एआय माध्यमातून नागरिकांच्या दैनंदिन सेवांचा अनुभव पूर्णपणे बदलू शकतो. परवाने, प्रमाणपत्रे किंवा इतर शासकीय सेवा यांसाठी अर्ज, तपासणी आणि मंजुरी प्रक्रिया मोठ्या प्रमाणात स्वयंचलित होऊ शकते. तसेच भविष्यात रोबोटिक्स आणि एआयच्या संगमामुळे उद्योग आणि रोजगार क्षेत्रातही मोठे परिवर्तन होणार असून, प्रशासनाने या बदलांसाठी सज्ज राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.


नागरिकांचेही डिजिटल सक्षमीकरण आवश्यक

डॉ. सुरेंद्रकुमार बागडे यांनी मुख्य वक्ते म्हणून मार्गदर्शन करताना सांगितले की, गेल्या दशकात नागरिक सेवा क्षेत्रात मोठे बदल झाले असून, कागदाधारित प्रणालीपासून डिजिटल प्रणालीकडे झालेल्या प्रवासामुळे सेवा अधिक सुलभ झाल्या आहेत. मात्र, केवळ डिजिटायझेशन पुरेसे नसून ‘एआय’च्या प्रभावी वापरातून नागरिकांना अधिक वेगवान, पारदर्शक आणि जबाबदार सेवा देणे आवश्यक आहे.

डेटा-आधारित निर्णयप्रक्रिया, रिअल-टाइम ट्रॅकिंग, ऑटोमेटेड तक्रार निवारण आणि नागरिकांना स्वतः सेवा घेता येईल अशी प्रणाली विकसित करण्यावर भर दिला पाहिजे. तसेच सेवा केंद्रांवरील अवलंबित्व कमी करून नागरिकांना थेट डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे सेवा मिळतील, अशी व्यवस्था उभारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

एआयच्या मदतीने अर्ज भरणे, त्रुटी दुरुस्ती, व्हॉईस-आधारित मार्गदर्शन, तसेच नागरिकांना त्यांच्या अर्जाच्या प्रत्येक टप्प्यावर माहिती देणे शक्य आहे. मोठ्या प्रमाणातील डेटा वापरून प्रशासन अधिक जबाबदार आणि पारदर्शक होऊ शकते, तसेच सेवा देण्याचा कालावधी कमी करता येऊ शकतो. मात्र, यासाठी केवळ अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण पुरेसे नसून नागरिकांचेही डिजिटल सक्षमीकरण आवश्यक असल्याचे डॉ. बागडे यांनी सांगितले.

स्वाधीन क्षत्रिय यांनी अध्यक्षीय भाषणात प्रशासनात तंत्रज्ञानाचा वापर करताना पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि नागरिक-केंद्रित दृष्टीकोन कायम ठेवण्याचे महत्त्व सांगितले.

००००

राजू धोत्रे/विसंअ

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp