Pune | Thu, 14 May 2026

Ad

पर्यटन वृद्धीसाठी सुविधा सक्षमीकरणावर भर द्यावा – मंत्री शंभूराज देसाई

Sunil Goyal | 10 views
पर्यटन वृद्धीसाठी सुविधा सक्षमीकरणावर भर द्यावा – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. २८: राज्यातील पर्यटन क्षेत्र अधिक सक्षम, परिणामकारक आणि पर्यटकाभिमुख करण्याच्या दृष्टीने पायाभूत सुविधा बळकटीकरण, सेवांचा दर्जा उंचावणे आणि पर्यटन उपक्रमांना गती देण्यावर भर देण्यात यावा, अशा सूचना पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.

मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली तथा राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ संचालक मंडळाची १७७ वी सर्वसाधारण बैठक सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे पार पडली.

यावेळी पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, पर्यटन संचालनालयाचे संचालक मंगेश जोशी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे, पर्यटन विभागाचे उपसचिव संतोष रोकडे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, कंपनी सचिव वर्षा चव्हाण उपस्थित होते.

या बैठकीत पर्यटन महामंडळाच्या एकूण कार्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच राज्यातील पर्यटन विकासाशी संबंधित विविध धोरणात्मक विषयांवर चर्चा करण्यात आली. पर्यटन क्षेत्रातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याबरोबरच सेवांची गुणवत्ता उंचावणे, पर्यटकांना अधिक दर्जेदार व सक्षम सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच पर्यटन प्रकल्पांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक दिशानिर्देश यावेळी देण्यात आले.

बैठकीत मंत्री देसाई यांनी पर्यटन विकासाशी संबंधित प्रकल्पांना गती देण्याच्या सूचना देत महामंडळाचे कामकाज अधिक परिणामकारक करण्यावर भर दिला. राज्यातील पर्यटन स्थळांचा दर्जा उंचावणे, सुविधा विस्तार, स्वच्छता, सेवा व्यवस्थापन आणि पर्यटकाभिमुख उपक्रम प्रभावीपणे राबविण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले.

तसेच पर्यटन क्षेत्रातील गुंतवणूक, स्थानिक सहभाग, रोजगारनिर्मिती आणि शाश्वत पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी विभागीय स्तरावर समन्वय वाढवून नियोजनबद्ध कामकाज करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनीही राज्यातील पर्यटन क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासन सकारात्मक व कटिबद्ध असून, पर्यटन वाढीस चालना देणाऱ्या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात येत असल्याचे नमूद केले.

राज्यातील पर्यटन क्षेत्राचा शाश्वत व सर्वांगीण विकास साधण्यासाठी शासन कटिबद्ध असून, पर्यटन विकासासाठी आवश्यक निर्णय आणि उपक्रमांना पुढील काळात अधिक गती देण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

००००

संध्या गरवारे/ वि.सं.अ

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp