
मुंबई, दि. १७ जून : पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई येथे ‘Histories Unbound: Dialogues Across Time’ या आंतरराष्ट्रीय समूह कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. Arts University Plymouth यांच्या सहकार्याने साकारलेल्या या प्रदर्शनात बार्बरा राचको, जेनी पेटीट, राजुल शाह, सुसान फ्रेझर-ह्यूजेस, सबीने जॅकार्ड आणि डॅनिलो प्रेटो या नामवंत कलाकारांच्या कलाकृती प्रदर्शित करण्यात येणार आहेत.
या प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ १८ जून रोजी सायं. ६ वाजता होणार आहे.
दोन दिवसीय हे प्रदर्शन इतिहास, स्मृती, ओळख आणि कल्पनाशक्ती यांच्यातील गुंतागुंतीच्या परस्परसंबंधांचा सखोल अभ्यास घडवणारे आहे. इतिहासाला केवळ भूतकाळाचा स्थिर दस्तऐवज म्हणून न पाहता, तो सतत नव्याने अर्थ प्राप्त करणारा आणि विविध दृष्टिकोनांतून उलगडणारा संवाद आहे, या संकल्पनेवर हे प्रदर्शन आधारित आहे.
विविध कलामाध्यमांतून साकारलेल्या कलाकृतींमधून प्रेक्षकांना भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य यांच्यातील संबंधांचा नव्या दृष्टीकोनातून विचार करण्याची संधी मिळेल. ‘भविष्य इतिहासाच्या ओझ्यातून मुक्त होऊ शकते का, की प्रत्येक नवीन सुरुवात ही इतिहासाच्या शाश्वत उपस्थितीतूनच जन्माला येते?’ या मूलभूत प्रश्नाभोवती प्रदर्शनाचा वैचारिक प्रवाह केंद्रित आहे.
हे प्रदर्शन जागतिक स्तरावरील कलात्मक संवादाला चालना देणारे असून, विविध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संदर्भांमधील विचारांची देवाणघेवाण घडवून आणण्याचा प्रयत्न करते. कला, इतिहास आणि मानवी अनुभव यांच्या संगमातून निर्माण होणाऱ्या नव्या शक्यतांचा शोध घेण्यासाठी हे प्रदर्शन एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरेल.
कला रसिक, अभ्यासक आणि माध्यम प्रतिनिधींनी या प्रदर्शनाला तसेच उद्घाटन समारंभाला उपस्थित राहून या वैश्विक कलासंवादाचा अनुभव घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
00000
