Pune | Sun, 28 June 2026

Ad

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ : कर्जाच्या अंधारातून समृद्धीच्या पहाटेकडे

Sunil Goyal | 2 views
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ : कर्जाच्या अंधारातून समृद्धीच्या पहाटेकडे

पूर्व क्षितिजावर सूर्याची पहिली किरणे डोकावण्याआधीच एका शेतकऱ्याचा दिवस सुरू झालेला असतो. एका हातात नांगर, खांद्यावर फावडे, कपाळावर घामाचे थेंब आणि मनात उद्याच्या भरघोस पिकाची असंख्य स्वप्ने… तो घरातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्या मागे उभे असते संपूर्ण कुटुंब. मुलांच्या शिक्षणाची स्वप्ने, वृद्ध आई-वडिलांच्या औषधांची गरज, पत्नीच्या डोळ्यांतील विश्वास आणि संसाराच्या गाड्याला पुढे नेण्याची जबाबदारी… हे सारे तो आपल्या खांद्यावर घेऊन शेतात उतरतो. मात्र प्रत्येक वेळी त्याच्या सोबत निसर्ग उभा राहीलच, याची खात्री नसते. कधी दुष्काळ, कधी गारपीट, कधी अतिवृष्टी, कधी महापूर तर कधी बाजारातील पडलेले दर… या सगळ्यांनी त्याच्या घामाची किंमत अनेकदा हिरावून घेतली आहे.

अशा वेळी शेतकऱ्याला फक्त आर्थिक मदतीची गरज नसते; त्याला गरज असते विश्वासाची, आधाराची आणि पुन्हा नव्याने उभे राहण्याची. याच मानवी वेदना आणि ग्रामीण वास्तवाचा विचार करून महाराष्ट्र शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’ जाहीर केली आहे. ही योजना केवळ कर्जमाफीचा शासकीय निर्णय नाही; ती लाखो शेतकरी कुटुंबांच्या डोळ्यांतील अश्रूंना आशेच्या हास्यात बदलण्याचा प्रयत्न आहे. पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्ती, नियमित कर्जफेड करणाऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ आणि शेतकरी पुन्हा कधीही कर्जाच्या दुष्टचक्रात अडकू नये यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांचा विचार या निर्णयात करण्यात आला आहे.

शेतकरी हा या देशाचा अन्नदाता आहे, हे आपण सहज म्हणतो; पण त्या एका शब्दामागे किती संघर्ष दडलेला आहे, याचा विचार आपण किती वेळा करतो? शेतकरी हा केवळ धान्य पिकवणारा माणूस नाही. तो मातीचा कलाकार आहे. निर्जीव वाटणाऱ्या जमिनीतून तो जीवन उगवतो. उन्हाच्या झळा, पावसाचा मारा, थंडीची कडाक्याची रात्र आणि काळजाचा ठोका चुकवणारी वादळे… या सगळ्यांशी तो दररोज दोन हात करत असतो. त्याच्या हातावर पडलेल्या घट्ट्या या केवळ श्रमाच्या खुणा नसतात; त्या राष्ट्राच्या अन्नसुरक्षेच्या साक्षीदार असतात.

आज आपण शहरात सुखाने जगत असताना आपल्या ताटात येणाऱ्या प्रत्येक भाकरीमागे एका शेतकऱ्याची झोप उडालेली असते. प्रत्येक दाण्यामागे त्याच्या संसाराचा त्याग असतो. त्याने आपल्या मुलाला  नवीन कपडे घेण्याचा विचार पुढे ढकललेला असतो. स्वतःच्या आजाराकडे दुर्लक्ष करून त्याने पिकाला औषध दिलेले असते. आपल्या कुटुंबाच्या छोट्या-छोट्या इच्छा बाजूला ठेवून त्याने बियाणे, खत आणि मजुरीसाठी कर्ज घेतलेले असते. म्हणूनच शेतकऱ्याचं कर्ज हे केवळ बँकेच्या वह्यांतील आकडे नसतात; ते त्याच्या आयुष्यावर कोरलेले संघर्षाचे अध्याय असतात.

गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातील शेतकरी अनेक संकटांतून गेला आहे. हवामान बदलामुळे पावसाचे चक्र पूर्णपणे विस्कळीत झाले. कधी पाऊस आला नाही म्हणून पेरणी रखडली, तर कधी पिके कापणीला आली असताना अवकाळी पावसाने संपूर्ण मेहनत वाहून नेली. अनेक भागांत गारपिटीने उभ्या पिकांचा चुराडा केला. महापुरांनी शेती गिळंकृत केली. त्याच वेळी खत, बियाणे, इंधन आणि मजुरीचा खर्च सातत्याने वाढत राहिला. उत्पादन खर्च वाढला; पण बाजारात योग्य भाव मिळाला नाही. परिणामी, अनेक शेतकऱ्यांना घेतलेल्या पीक कर्जाची वेळेवर परतफेड करता आली नाही. थकीत कर्ज वाढले आणि नव्याने कर्ज मिळवण्याचे दरवाजेही बंद होऊ लागले. ही परिस्थिती म्हणजे केवळ आर्थिक अडचण नव्हती; ती मानसिक, सामाजिक आणि कौटुंबिक संकटाची सुरुवात होती.

अनेक गावांमध्ये आजही अशी घरे आहेत, जिथे संध्याकाळी चुल पेटते; पण घरातील संवाद मात्र शांत असतो. वडिलांच्या चेहऱ्यावरची चिंता मुलांना दिसत असते, पण तिचे कारण त्यांना समजत नाही. आई देवघरात दिवा लावताना देवाकडे फक्त एकच मागते “या वर्षी तरी आमचं पीक वाचू दे.” अशा असंख्य कुटुंबांच्या वेदना समजून घेत शासनाने या योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना कमाल दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्ती, नियमित कर्जफेड करणाऱ्यांना कमाल पन्नास हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ, तसेच काही प्रकरणांमध्ये एकवेळ समझोता (OTS) यांसारख्या तरतुदी केल्या आहेत. या निर्णयामागे केवळ आर्थिक विचार नाही, तर शेतकऱ्याचा आत्मविश्वास पुन्हा उभा करण्याचा प्रयत्न आहे.

काही लोक म्हणतात, दोन लाख रुपयांनी काय बदलणार? पण ज्याने आयुष्यभर कर्जाच्या सावलीत जगलं आहे, त्याला या प्रश्नाचं उत्तर विचारण्याची गरज नाही. कारण त्याच्यासाठी हे दोन लाख म्हणजे फक्त पैसे नाहीत; ते त्याच्या मनावरील ओझं हलकं करणारा प्राणवायू आहे. ते बँकेच्या दारात पुन्हा स्वाभिमानाने उभं राहण्याचं धैर्य आहेत, ते मुलांच्या शिक्षणाचं अर्धवट राहिलेलं स्वप्न पुन्हा सुरू करण्याची संधी आहेत, ते पत्नीच्या चेहऱ्यावर अनेक वर्षांनी उमटणारं समाधानाचं हास्य आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, ते स्वतःवरचा विश्वास परत मिळवण्याची ताकद आहेत.

या योजनेचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही शासन विसरलेले नाही. जे शेतकरी कितीही संकटे आली तरी आर्थिक शिस्त पाळत वेळेवर कर्जफेड करतात, त्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याची तरतूद या योजनेत करण्यात आली आहे. हा निर्णय केवळ दिलासा नाही; तर प्रामाणिकपणा, जबाबदारी आणि आर्थिक शिस्तीचा सन्मान आहे.

या योजनेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात आले आहे, ही बाब अत्यंत प्रतीकात्मक आहे. अहिल्यादेवींच्या राज्यकारभाराचा केंद्रबिंदू होता, रयतेचे कल्याण. त्यांनी सत्तेला कधीही अहंकाराचे साधन बनू दिले नाही. त्यांनी लोकांच्या सुख-दुःखाला स्वतःचे मानले. शेतकरी, गरीब, विधवा, व्यापारी, यात्रेकरू समाजातील प्रत्येक घटकासाठी त्यांनी लोकाभिमुख निर्णय घेतले. त्यांच्या नावाने सुरू झालेली ही योजना म्हणजे त्याच लोककल्याणकारी परंपरेचा आधुनिक काळातील विस्तार आहे. हा निर्णय शेतकऱ्याला मदत देण्याचा नाही; तर त्याच्या कष्टांचा सन्मान करण्याचा आहे.

परंतु ही योजना शेतकऱ्याला फक्त आजचा दिलासा देण्यासाठी नाही. शासनाने स्पष्टपणे नमूद केले आहे की, शेतकरी वारंवार कर्जाच्या दुष्टचक्रात अडकू नयेत यासाठी दीर्घकालीन संरचनात्मक सुधारणा, सक्षम बँकिंग व्यवस्था आणि शाश्वत कृषी विकासाच्या दिशेनेही पावले उचलली जातील. म्हणजेच हा निर्णय केवळ वर्तमानापुरता मर्यादित नसून, भविष्यातील सक्षम शेती व्यवस्थेचा पाया घालणारा आहे.

मात्र, शासनाने पुढे केलेल्या या मदतीच्या हाताला शेतकऱ्यांनीही आत्मविश्वासाने प्रतिसाद दिला पाहिजे. आधुनिक शेतीचा स्वीकार, पाणी संवर्धन, पीक विविधीकरण, पूरक व्यवसाय, शेतमालावर प्रक्रिया, बचतीची सवय आणि वेळेवर कर्जफेड यांचा मार्ग स्वीकारला, तरच ही कर्जमुक्ती कायमस्वरूपी समृद्धीत बदलू शकेल. कारण खरी कर्जमुक्ती ही बँकेच्या आकड्यांत होत नाही; ती विचारांमध्ये होते.

आज प्रत्येक शेतकऱ्याने स्वतःशी एक संकल्प करायला हवा “मी संकटांपुढे हार मानणार नाही. मी शेती सोडणार नाही. माझ्या मुलांना संघर्षाचा वारसा नव्हे, तर समृद्धीचा वारसा देणार आहे.” कारण शेती ही केवळ उपजीविकेचं साधन नाही; ती आपल्या संस्कृतीचा श्वास आहे, आपल्या मातीतल्या स्वाभिमानाची ओळख आहे आणि भारताच्या भविष्याचा पाया आहे.

मातीला एक अद्भुत गुणधर्म लाभलेला आहे. ती कितीही वेळा कोरडी पडली, कितीही वेळा पायाखाली तुडवली गेली, तरी पहिला पाऊस पडताच ती पुन्हा हिरवगार जीवन उगवते. शेतकरीही तसाच असतो. संकटे त्याला थकवू शकतात; पण पराभूत करू शकत नाहीत. कारण त्याच्या हातात नांगर आहे, हृदयात आशा आहे आणि मातीवर अढळ विश्वास आहे.

आज महाराष्ट्र शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’च्या माध्यमातून शेतकऱ्याच्या पाठीवर विश्वासाचा हात ठेवला आहे. आता या विश्वासाचे रूपांतर आत्मविश्वासात करणे, ही प्रत्येक शेतकऱ्याची सामूहिक जबाबदारी आहे.

आज बँकेच्या आकड्यांमधील थकबाकी कमी होईल…

उद्या शेतात पुन्हा हिरवळ डोलू लागेल…

परवा मुलांच्या डोळ्यांत शिक्षणाची नवी स्वप्ने फुलतील…

आणि फार दूर नाही, असा दिवसही उगवेल, जेव्हा महाराष्ट्राचा शेतकरी “कर्जबाजारी” म्हणून नव्हे, तर “समृद्ध, स्वाभिमानी, आत्मनिर्भर आणि कायमस्वरूपी कर्जमुक्त अन्नदाता” म्हणून जगासमोर अभिमानाने उभा राहील.

कारण…

ज्या हातांनी संपूर्ण देशाच्या ताटात अन्न वाढले, त्या हातांवर कर्जाचा बोजा कधीच शोभत नाहीत. त्या हातांमध्ये स्वाभिमानाचा नांगर, समृद्धीची बीजे आणि उज्ज्वल भविष्याची मशालच शोभते.

रणजितसिंह राजपूत, जिल्हा माहिती अधिकारी, नंदुरबार

0000000000

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp