Pune | Wed, 01 July 2026

Ad

राज्यपाल जिष्णु देव वर्मा , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डॉ. दीपक सावंत यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

Sunil Goyal | 1 views
राज्यपाल जिष्णु देव वर्मा , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डॉ. दीपक सावंत यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई, दि. १: राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी लिहिलेल्या ‘क्लायमेट चेंज, एक चक्रव्यूह’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत लोकभवन येथे झाले.

वातावरण बदलांमुळे जगातील विकसित आणि विकसनशील दोन्ही देश बाधित होत आहेत. हवामान बदलाचे चटके आज आपण सोसत आहोत. हवामान बदलाचा मोठा फटका समाजातील शेवटच्या स्तरावरील लोकांना बसतो. त्यामुळे आपली ध्येयधोरणे ठरवताना हवामान बदलाचा विचार करावा लागेल असे प्रतिपादन राज्यपालांनी यावेळी बोलताना केले.

निसर्गाविरुद्ध जाऊन मानवाला जगता येणार नाही तर त्याला निसर्गाशी जुळवून वाटचाल करावी लागेल असे त्यांनी यावेळी सांगितले. पूर्वी ‘विकास की पर्यावरण’ या विषयावर चर्चा व्हायची. परंतु आज शाश्वत विकासावर चर्चा होत आहे ही समाधानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. पर्यावरण रक्षण ही सर्वांची जबाबदारी असून त्या दृष्टीने वृक्षारोपण व जलसंवर्धनाचे कार्य झाले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.

उत्तरपूर्वेकडील राज्यात ‘अतिथी देवो भव’ म्हणतात त्याप्रमाणे ‘प्रकृति देवो भव’ असे म्हटले जाते, असे राज्यपालांनी सांगितले. ‘क्लायमेट चेंज, एक चक्रव्यूह’ हे पुस्तक मराठी भाषेतून लिहिल्याबद्दल राज्यपालांनी डॉ दीपक सावंत यांचे अभिनंदन केले.

जागतिक हवामान बदलत होत आहेत तसे राजकीय हवामान देखील बदलत आहे असे सांगून डॉ दीपक सावंत यांचे ‘क्लायमेट चेंज’ हे पुस्तक दीपस्तंभाप्रमाणे जनसामान्यांना मार्गदर्शक ठरेल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. हवामान बदलामुळे अतिवृष्टी, अनावृष्टी, गारपीट, अवर्षण आदी गोष्टी वारंवार घडत आहेत. हवामान बदलाचे हे चक्रव्यूह तोडण्यासाठी सर्वांना काम करावे लागेल असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

हवामान बदलांमुळे कुपोषण वाढेल, जीवनशैलीशी निगडित आजार वाढतील, डेंग्यू, चिकन गुनिया सारखे आजार वाढतील असा इशारा डॉ सावंत यांनी दिला.  काही वर्षांनी मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया व शिवाजी पार्क पाण्याखाली जाईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली.  हवामान बदल हा विषय आपण २०१० साली सभागृहात मांडला होता व भविष्यात देखील तो मांडण्याची संधी मिळेल असे डॉ सावंत यांनी सांगितले.

जागतिक वातावरण बदल या विषयावर विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय लेखांचे अध्ययन करुन सदर पुस्तक संकलित केले असल्याचे डॉ सावंत यांनी यावेळी सांगितले. या पुस्तकामध्ये हवामान बदलाचा चक्रव्यूह, हवामान बदल आणि मृदा, हवामान बदल आणि जीवघेणे आजार, हवामान बदल आणि अन्नसुरक्षा, कुपोषण आणि हवामान बदल आदी प्रकरणाचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

क्लायमेट चेंज एक चक्रव्यूह हे आपले दहावे पुस्तक असून पुढील पुस्तक ‘वाघाचे मानसशास्त्र असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

००००

 

 

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp