
नागपूर, दि. २५ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ आधुनिकीकरण आणि विस्तारासाठी जीएमआर समूहाकडे सोपविण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी व केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू तसेच जीएमआर कंपनीचे जी.बी.एस. राजू यांच्या प्रमुख उपस्थितीत हा हस्तांतरण सोहळा अत्यंत आधुनिक पद्धतीने पार पडला.
विमानतळाच्या गेटवर रोबोटच्या सहाय्याने फित कापून मुख्य ईमारतीत प्रवेश केला. त्यानंतर दीप प्रज्वलीत करुन शुभ कार्याची सुरुवात झाली. त्यानंतर विमानतळ हस्तांतरणाच्या प्रमुख कार्यक्रमाची सुरुवात झाली. या ऐतिहासिक बदलामुळे नागपूरची हवाई जोडणी आणि पायाभूत सुविधा जागतिक दर्जाची होण्याचा मार्ग खुला झाला आहे.

विमान परिचलन त्यासोबतच मालवाहतूक यासाठी दुसऱ्या धावपट्टीची निर्मिती होत असल्यामुळे विदर्भाच्या विकासाला निश्चितच नवी दिशा मिळणार आहे. नागपूर येथून आता दुबई, सिंगापूर यासोबतच देशाच्या विविध भागात पोहोचण्यासाठी महत्त्वाचे डेस्टिनेशन ठरणार असल्यामुळे पर्यटनालाही चालना मिळणार आहे. अत्याधुनिक विमानतळाच्या निर्मितीची विदर्भवासीयांची मागणी खऱ्या अर्थाने पूर्ण होत आहे. हे विमानतळ सार्वजनिक खासगी भागीदारीतून विकसित करण्यात येत आहे. यासाठी जीएमआर समूहाला विकासक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
देशातील अत्याधुनिक विमानतळाचा दर्जा यामुळे मिळणार असून, नागपूरची सांस्कृतिक व ऐतिहासिक ओळख जागतिक पातळीवर प्रस्थापित व्हावी यासाठी देशाच्या हृदयस्थानी असलेल्या नागपूर येथील झिरो माइल तसेच संपूर्ण जगात संत्र्याचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत्रा याचा वापर बोधचिन्हात अत्यंत समर्पकपणे करण्यात आला आहे. बोधचिन्हाचे सादरीकरण आधुनिक पद्धतीने तेवढेच प्रभावीपणे करण्यात आले आहे.
नागपूरची स्वतंत्र वेबसाईट
विमानतळावर असलेल्या सुविधांची संपूर्ण माहिती असलेली वेबसाईट सुद्धा निर्माण करण्यात आली आहे. नागपूर विमानतळ हे अत्याधुनिक होईल यात शंकाच नाही. जीएमआर कंपनीला हस्तांतरणाचा सोहळा तेवढ्याच कल्पकतेने आणि पुढील विकासाची दिशा देणार आहे.
नागपूर विमानतळाचा विकास दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्याचे काम वर्षभरात पूर्ण होत असले, तरी अत्याधुनिक व सुसज्ज अशा सोयी सुविधा, दुसरी धावपट्टी आणि कार्गो साठी सर्व सुविधा दुसऱ्या टप्प्यात पूर्ण होणार आहेत. हा टप्पा पूर्ण करण्यासाठी २०३० पर्यंत कालावधी निर्धारित केला असला, तरी संपूर्ण विमानतळाचे बांधकाम २०२९ पूर्वीच पूर्ण करून उद्घाटनासाठी सज्ज ठेवावे अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मध्य भारताच्या विकासाचे ग्रोथ इंजिन म्हणून हा प्रकल्प दिशा देऊ शकतो. नागपूर हे या भागाच्या आर्थिक उन्नतीचे मोठे केंद्र बनणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
००००
