Pune | Thu, 14 May 2026

Ad

सहायक फौजदार चेतना पाटील यांचा पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केला सत्कार

Sunil Goyal | 6 views
सहायक फौजदार चेतना पाटील यांचा पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केला सत्कार

मुंबई, दि. 29 : छत्रपती संभाजीनगर येथून कुटुंबासह मुंबईत पर्यटनासाठी आलेली आठ वर्षीय अनाबिया शेख हरवल्यानंतर आझाद मैदान पोलीस स्टेशनच्या महिला सहाय्यक फौजदार चेतना पाटील आणि त्यांच्या पथकाने अवघ्या एका तासात बालिकेचा शोध घेऊन तिला सुरक्षितपणे पालकांच्या ताब्यात दिल्याबद्दल मंत्रालयात पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.मंत्रालयातील पर्यटन मंत्र्यांच्या दालनात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महिला सहाय्यक फौजदार चेतना पाटील यांना प्रशस्तीप्रत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सारख्या अतिविशाल आणि गर्दीच्या रेल्वे स्थानकाच्या परिसरात ही घटना घडली होती. दररोज लाखो प्रवाशांची वर्दळ असलेल्या या स्थानकात हरवलेल्या बालिकेचा अल्पावधीत शोध घेणे हे अत्यंत आव्हानात्मक काम होते. अशा परिस्थितीत चेतना पाटील आणि त्यांच्या पथकाने दाखवलेली तत्परता, समन्वय आणि सूक्ष्म तपास कौतुकास्पद ठरला आहे.

पर्यटन मंत्री देसाई म्हणाले की, मुंबईत आलेल्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी दाखविण्यात आलेली तत्परता आणि संवेदनशीलता ही अत्यंत प्रशंसनीय आहे. पर्यटकांचा सुरक्षिततेवरील विश्वास अबाधित राखण्यासाठी अशा प्रकारचे कार्य महत्त्वपूर्ण असून चेतना पाटील आणि त्यांच्या पथकाने केलेली कामगिरी पोलीस दलासाठी प्रेरणादायी आहे.

पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत हरवलेल्या बालिकेचा अल्पावधीत शोध घेऊन सुरक्षितपणे पालकांच्या ताब्यात देणे ही जबाबदारीची उत्कृष्ट जाणीव दर्शवणारी बाब आहे. अशा उल्लेखनीय कार्याचा गौरव व्हावा यासाठी महिला सहाय्यक फौजदार चेतना पाटील यांच्या नावाची गृह राज्यमंत्री यांच्याकडे विशेष प्रशस्ती आणि गौरवासाठी शिफारस करण्यात येणार असल्याचे पर्यटन मंत्री देसाई यांनी सांगितले.

महाराष्ट्रात येणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि सकारात्मक वातावरण मिळणे ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. पर्यटन स्थळे, वाहतूक व्यवस्था, तसेच गर्दीच्या ठिकाणी सुरक्षेची काटेकोर अंमलबजावणी करून पर्यटकांचा विश्वास दृढ ठेवण्यावर शासनाचा भर आहे. यासाठी पोलीस यंत्रणा, स्थानिक प्रशासन आणि संबंधित विभाग यांच्यात प्रभावी समन्वय साधला जात आहे. अशा सकारात्मक उपक्रमांमुळे केवळ पोलीस दलाचे मनोबल वाढणार नाही, तर महाराष्ट्राची ‘सुरक्षित पर्यटन राज्य’ म्हणून ओळख अधिक बळकट होण्यास मदत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

००००

संध्या गरवारे/विसंअ

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp