Pune | Sat, 16 May 2026

Ad

शेतकऱ्यांना वेळेवर बियाणे, खते आणि कर्ज उपलब्ध करा – पालकमंत्री संजय शिरसाट

Sunil Goyal | 1 views
शेतकऱ्यांना वेळेवर बियाणे, खते आणि कर्ज उपलब्ध करा – पालकमंत्री संजय शिरसाट

छत्रपती संभाजीनगर, दि. १६: शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी वेळेवर बियाणे, खते आणि पीक कर्ज उपलब्ध करुन द्या, जेणेकरुन हंगामाचे काम सुरळीत पार पडेल, असे निर्देश राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिले. कर्ज माफीला पात्र शेतकऱ्याला पीक कर्ज मिळण्याबाबत असलेला संभ्रम दुर करण्याबाबत मंत्रीमंडळाच्या येत्या बैठकीत विषय मांडू असेही पालकमंत्री शिरसाट यांनी उपस्थितांना सांगितले.

खरीप हंगामपूर्व नियोजन बैठक आज (दि.१५) जिल्हा नियोजन सभागृहात पार पडली. इमाव कल्याण, दुग्ध विकास व अपारंपारिक उर्जा मंत्री अतुल सावे, जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे, खा.डॉ. कल्याण काळे, विधान परिषद सदस्य आ.अंबादास दानवे, आ. विक्रम काळे, आ. सतिष चव्हाण, विधानसभा सदस्य आ. प्रदीप जयस्वाल, आ. रमेश बोरनारे, आ. प्रशांत बंब, आ. संजना जाधव, आ. विलास भुमरे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष जितेंद्र जयस्वाल, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम., पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी, जिल्हा कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील तसेच अन्य संबंधित विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते. जिल्ह्याच्या खरीप हंगामाचे नियोजन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी यांनी सादर केले. यावेळी लोकप्रतिनिधींनी मुद्दे मांडले.

आ. प्रशांत बंब यांनी सुचना केली की, बँका शेतकऱ्यांना उद्दिष्टाइतके कर्ज वाटप करीत नाहीत. तसेच शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणाऱ्या अन्य अनुदानांवर होल्ड लावून ते कर्जात जमा करतात. तसेच खतांचे आवंटन हे जितकी आवश्यकता आहे तितके करावे. त्यापेक्षा कमी करु नये. तसेच खतांचे लिंकींग हा प्रश्न वरिष्ठ पातळीवर मांडून त्यावर तोडगा काढावा असेही त्यांनी मुद्दे मांडले.

खा. कल्याण काळे म्हणाले की, खते हे निर्धारित किंमतीत मिळतात का? याची वस्तुनिष्ठ माहिती घ्यावी. खतांचे लिंकींग या प्रकाराला आळा घालावा. तसेच खतांचे आवंटन वेळेवर यावे यासाठी प्रयत्न करावे. त्यांनी सांगितले की, सोयाबीन बियाणे शेतकऱ्यांना घरगुती उपलब्धता करण्यास सांगितले आहे. त्याची उगवण क्षमता तपासणी करुन ते बियाणे खरोखर उपलब्ध असल्याबाबत खात्री करावी.

आ.बोरनारे म्हणाले की, खतांचे लिंकिंग होऊ नये यासाठी प्रभावी उपाययोजना राबवावी. संलग्न जिल्ह्यातील शेतकरी ही आपल्या जिल्ह्यातून खतांची खरेदी करतात ही बाब लक्षात घेऊन आवंटन मागणी नोंदवावी. तसेच नजिकच्या रेल्वे स्थानकावरुन खतांची रॅक उपलब्ध करावी, अशी सुचना केली.

आ. विलास भुमरे यांनी शेतकऱ्यांच्या विविध अनुदानाची रक्कम होल्ड करुन कर्ज खात्यात जमा करण्याच्या प्रकारास निर्बंध करावा, अशी सुचना केली.

आ. अंबादास दानवे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना कर्ज माफीची घोषणा शासनाने केली आहे. तथापि, आता नव्या हंगामासाठी कर्ज उपलब्ध करतांना जुने पीक कर्ज परतफेड केल्याशिवाय नवे कर्ज उपलब्ध होणार नाही. अशा परिस्थितीत संबंधित शेतकरी कर्ज माफीला पात्र राहिल का? किंवा कर्ज माफीला पात्र शेतकरी नव्या पीक कर्जाला पात्र असेल का? याबाबतचा संभ्रम दुर करावा. तसेच खताचे लिंकींग बाबत वरिष्ठ पातळीवरुन कारवाई व्हावी. तसेच सोयाबीन बियाणे उपलब्धतेबाबत खातरजमा करावी, अशा सुचना केल्या.

बैठकीत सादर करण्यात आलेली माहितीः-

दृष्टीक्षेपात जिल्हा 

भौगोलिक क्षेत्र- १० लाख ७ हजार हेक्टर, तालुके-९. महसूल मंडळ-८४, कृषी मंडळ २८, ग्रामपंचायत ८७०, एकूण गावे १३५५, जंगल क्षेत्र ०.८२ लाख हेक्टर, वहितीखालील क्षेत्र ७.९० लाख हे., सरासरी खरीप क्षेत्र – ६.८१ लाख हेक्टर, खरीप २०२७ मधील प्रस्तावित पेरणी क्षेत्र-६.९७ लाख हे. एकूण खातेदार संख्या- ७ लाख १९ हजार ३४४. जिल्ह्यात लघु प्रकल्प ९८, मध्यम प्रकल्प- १६ आणि मोठे प्रकल्प १ असे एकूण ११४ सिंचन प्रकल्प आहेत. साखर कारखाने ७ आहेत. सरासरी पर्जन्यमान ६७५ मि.मी आहे. रब्बी चे सरासरी क्षेत्र १.९० लाख हे.

पिकनिहाय प्रस्तावित पेरणीक्षेत्र 

कापूस-३०८४५४ हे., मका-२६५६३० हे., तूर-५४८०३ हे., सोयाबीन- ३४२१७ हे., मुग- १२१६७ हे., बाजरी- ९०६८ हे., भुईमुग- ८१९९ हे., उडीद-३८६६ हे, खरीप ज्वारी- ७३ हे.,तीळ-१३९ हे, इतर पिके-४७१ हे. असे एकूण ६ लाख ९७ हजार ८७ हेक्टर क्षेत्रावर पिकनिहाय पेरणी प्रस्तावित आहे.

बियाणे मागणी

पिकनिहाय बियाणे मागणी याप्रमाणे- मका- ३९८४५ क्विंटल, तूर-२८७७ क्विंटल,मुग-४०२ क्विंटल, उडीद-२०३क्विंटल, कापूस ७७११ क्विंटल (१७ लाख १३ हजार पाकिटे), सोयाबीन बियाणे- २५ हजार ७३८ क्विंटल. इतकी मागणी आहे.

खतांची मागणी

जिल्ह्यात रासायनिक खतांचा सरासरी वापर २ लाख ७३ हजार १९३ मे.टन इतका असून खरीप हंगाम २०२६ साठी ३ लाख ९५ हजार ७४९ मे.टन इतकी मागणी आहे. प्रत्यक्षात मंजूर आवंटन २ लाख ९२ हजार ७०० मे.टन आहे. जिल्ह्यात एप्रिल २०२५ अखेर शिल्लक खत साठा १ लाख २३ हजार ९२८ मे.टन इतका आहे.

‘अल-निनो’ बाबत सादरीकरण

खरीप हंगाम नियोजन बैठकीत प्रथमच अल निनो संदर्भात माहिती सादर करण्यात आली. त्यावेळी माहिती देण्यात आली की, प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान जेव्हा सामान्यापेक्षा जास्त वाढते तेव्हा त्या घटनेला अलनिनो असे म्हणतात. यामुळे वाऱ्यांची दिशा बदलून त्याचा परिणाम भारतातील पावसावर होतो. यामुळे पर्जन्यमानात बदल होऊन दुष्काळाची शक्यता वाढते. तसेच १ ते २ अंशांनी तापमान वाढते. त्यामुळे जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होतो,अशी माहिती देण्यात आली.

पावसाचे आगमन आणि पेरणीचा कालावधी

कृषी विद्यापीठाने केलेल्या शिफारसीनुसार दि. १५ ते ३० जून तसेच १ जुलै ते ७ जुलै दरम्यान पाऊस आल्यास सर्व खरीप पिके पेरता येतील. दि. ८ ते १५ जुलै दरम्यान कापूस, संकरीत ज्वारी, बाजरी, सोयाबिन, तूर, तीळ, सूर्यफूल, मका इ. पिके, तर दि. १६ ते ३१ जुलै दरम्यान सोयाबीर, बाजरी, तूर, एरंडी, धने, एरंडी तूर, एरंडी आणि मका असे पिके पेरता येतील अशा शिफारशी विद्यापीठाने केल्या आहेत,अशी माहिती सादरीकरणात देण्यात आली.

पीक कर्ज व कर्ज माफीबाबत मंत्रीमंडळ बैठकीत विषय मांडू – पालकमंत्री शिरसाट

खरीप आढावा बैठकीत पालकमंत्री शिरसाट म्हणाले की, घरगुती सोयाबीन बियाणे वापराबाबत शेतकऱ्यांना सांगितले जात असले तरी या बियाण्याची उगवण क्षमता तपासणी करावी. या तपासण्यांबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींना अवगत करावे. तलावांमधील गाळ काढून तो शेतकऱ्यांच्या शेतात टाकला जावा याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. बी-बियाणे, खतांची मागणी आवश्यकता पूर्ण होईल त्याच्या दीडपट करावी. त्यात संलग्न जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या वापराचा विचार व्हावा. तसेच पीक कर्ज व कर्ज माफी याबाबत असलेला संभ्रम दूर व्हावा यासाठी मंत्रिमंडळाच्या येत्या बैठकीत विषय मांडू, असे पालकमंत्री शिरसाट यांनी सांगितले.

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp