Pune | Thu, 14 May 2026

Ad

शून्यातून विश्व निर्माण करणारे रामशेठ ठाकूर आधुनिक काळातील ‘एकलव्य’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Sunil Goyal | 1 views
शून्यातून विश्व निर्माण करणारे रामशेठ ठाकूर आधुनिक काळातील ‘एकलव्य’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा अमृत महोत्सवी सत्कार सोहळा 

नवी मुंबई,दि. १३ (विमाका): सामान्य माणसाने असामान्य कसं व्हायचं, याचा वस्तुपाठ म्हणजे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा जीवनप्रवास आहे. ज्या रयत शिक्षण संस्थेने त्यांना घडवलं, त्याच संस्थेला आजवर 135 कोटींहून अधिक रुपयांची गुरुदक्षिणा देऊन त्यांनी आधुनिक काळातील ‘एकलव्य’ ही ओळख सार्थ ठरवली आहे, अशा गौरवपूर्ण शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या कार्याचा गौरव केला.

उलवे येथे ‘रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल’च्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

रामशेठ ठाकूर अमृत महोत्सव वर्ष नियोजन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबईतील सेक्टर १२, उलवे नोड येथे हा विशेष सोहळा पार पडला. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था, पनवेल आणि लोकनेते या निमित्ताने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळाही थाटात पार पडला.

यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. ज्येष्ठ नेते तथा राज्यसभा खासदार शरद पवार हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाला वनमंत्री गणेश नाईक, माहिती व तंत्रज्ञान (IT) आणि सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, रोजगार हमी योजना, फलोत्पादन, खारभूमी विकास मंत्री भरतशेठ गोगावले, खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार दिलीप वळसे पाटील, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यकारी मंडळ सदस्य तथा आमदार प्रशांत ठाकूर, लोकनेते रामशेठ ठाकूर अमृत महोत्सव वर्ष नियोजन समितीचे अध्यक्ष तथा आमदार महेश बालदी आणि आमदार रविंद्र चव्हाण, रायगड-नवी मुंबईतील आमदार मंदा म्हात्रे, आमदार रविशेठ पाटील, आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे, आमदार विक्रांत पाटील, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, रयत शिक्षण संस्था, साताराचे चेअरमन चंद्रकांत दळवी, पनवेलचे महापौर नितीन पाटील, अतुल पाटील या मान्यवरांसह मोठया संख्येने विद्यार्थी पालक आणि नागरिक उपस्थित होते.

रामशेठ ठाकूर यांच्या कार्याचा गौरव करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सामान्य कुटुंबात जन्म घेऊन मेहनतीच्या जोरावर असामान्य कर्तृत्व कसं गाजवायचं, याचा वस्तुपाठ म्हणजे रामशेठ ठाकूर यांचा जीवनप्रवास आहे. ज्या रयत शिक्षण संस्थेने त्यांना घडवले, त्या संस्थेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी आजवर १३५ कोटींहून अधिक रुपयांची मदत केली असून, गुरूंनी न मागता सढळ हाताने गुरुदक्षिणा देणारा हा आधुनिक काळातील ‘एकलव्य’ आहे. अवघ्या २०० रुपये पगारावर शिक्षक म्हणून आपली कारकीर्द सुरू करणाऱ्या रामशेठजींनी आपल्या आयुष्याची सर्व पुंजी समाजाला सुशिक्षित करण्यासाठी आणि उत्तम शैक्षणिक संस्था उभ्या करण्यासाठी खर्च केली, हे शिक्षणाचे मोठे पुण्यकर्म आहे.

त्यांच्या व्यावसायिक जिद्दीचे कौतुक करताना मुख्यमंत्री म्हणाले की, घरचे दागिने गहाण ठेवून आणि १० हजार रुपयांच्या पहिल्या कंत्राटातून व्यवसायाची सुरुवात करणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाने भूमिपुत्रही मोठे कंत्राटदार होऊ शकतात, हे आपल्या जिद्दीने सिद्ध केले. सत्तेच्या राजकारणात असतानाही वयाच्या ५२ व्या वर्षी स्वेच्छेने निवडणूक राजकारणातून निवृत्ती घेण्याचा त्यांचा निर्णय हा राजकीय नि:स्पृहतेचे मोठे लक्षण आहे. दि. बा. पाटलांच्या नेतृत्वाखाली भूमिपुत्रांच्या हक्कासाठी त्यांनी दिलेला लढा ऐतिहासिक असून, नवी मुंबई व रायगडचा विकास ‘मुंबईपेक्षाही सुंदर शहर’ म्हणून करण्याचे सरकारचे ध्येय आहे, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी रामशेठ ठाकूर दांपत्याला दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

रामशेठ ठाकूर म्हणजे विकासाचे कणखर नेतृत्व : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे रामशेठ ठाकूर यांच्याबद्दल कौतुकास्पद भाष्य करताना म्हणाले की,  “लोकनेते रामशेठ ठाकूर हे केवळ उद्योजक नसून भूमिपुत्रांच्या हक्कासाठी लढणारे आणि विकासाला गती देणारे कणखर नेतृत्व आहेत,” अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांचा गौरव केला. १९९५ च्या काळात कंत्राटदारांनी अर्धवट सोडलेली मुंबई-पुणे एक्सप्रेसवे आणि उड्डाणपुलांची कामे रामशेठ ठाकूर यांच्या धाडसी सहकार्यामुळेच पूर्ण होऊ शकली, अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितली.

केंद्रीय मंत्री गडकरी पुढे म्हणाले की, रामशेठ ठाकूर यांनी जेएनपीटी आणि सिडकोच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांना रोजगार मिळवून देण्यासाठी मोठा संघर्ष केला. विकासाची फळे स्थानिक माणसापर्यंत पोहोचली पाहिजेत, हा त्यांचा विचार मोलाचा आहे. सत्तेचा त्याग करून त्यांनी जनसेवेचे व्रत स्वीकारले, असे म्हणत गडकरींनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले. नवी मुंबई आणि रायगडच्या सर्वांगीण प्रगतीत त्यांची दूरदृष्टी महत्त्वाची ठरली असून त्यांना उदंड आयुष्य लाभो, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.

आपल्या अमृत महोत्सवी सत्कार सोहळ्यात कृतज्ञता व्यक्त करताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नमूद केले की, आजवरच्या 75 वर्षांच्या प्रवासात गाढवावरून माती वाहण्यापासून ते यशस्वी उद्योजक आणि राजकारणी होण्यापर्यंत अनेक खाचखळगे त्यांनी अनुभवले आहेत. मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि जनतेने दिलेल्या उदंड प्रेमामुळेच आपले जीवन यशस्वी झाले असून, हे प्रेमच आपल्याला समाजकार्यासाठी ऊर्जा देते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. 81 आणि 84 च्या आंदोलनातील संघर्षाची आठवण करून देताना त्यांनी भूमिपुत्रांच्या हक्कासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे सांगितले. तसेच, नवी मुंबई आणि उलवे परिसरातील गावठाण विस्तार व पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री सकारात्मक असून प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लागतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आपल्या मुलांनी समाजकार्याचा वारसा समर्थपणे स्वीकारल्याचा आनंद व्यक्त करत, पुढील 10 ते 20 वर्षे जनतेची सेवा करण्यासाठी आपण सज्ज आहोत, असे त्यांनी आपल्या मनोगतातून स्पष्ट केले.

लोकनेते रामशेठ ठाकूर अमृत महोत्सव वर्ष नियोजन समितीचे अध्यक्ष तथा आमदार महेश बालदी यांनी प्रास्ताविक भाषणात रामशेठ ठाकूर यांच्या राजयकीय कारकिर्दीबाद्दल माहिती दिली.

यावेळी रामशेठ ठाकूर यांचा वैयक्तिक आणि राजकीय कार्यकाळाची  चित्रफीत सदर करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, पुष्पगुच्छ आणि चाफ्याच्या फुलांची परडी आणि सन्मान चिन्ह देऊन रामशेठ ठाकूर यांचे सपत्निक अभिष्टचिंतन करण्यात आले.

यावेळी रामशेठ ठाकूर यांच्या जीवनावर आणि राजकीय कार्यकाळावर प्रकाश टाकणारा रामपर्व या ग्रंथाचे अनावरण आणि प्रकाशन करण्यात आले.

०००

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp