Pune | Thu, 02 July 2026

Ad

समाज परिवर्तनासाठी थोर महापुरुषांच्या जीवनकार्याबाबत संशोधन – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

Sunil Goyal | 1 views
समाज परिवर्तनासाठी थोर महापुरुषांच्या जीवनकार्याबाबत संशोधन – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई, दि. २ : समाज परिवर्तनासाठी थोर महापुरुषांच्या जीवनप्रवासाचे आणि कार्यकर्तृत्वाचे सखोल संशोधन होणे आवश्यक असून, चरित्र-साधने प्रकाशन समित्यांनी नवीन साहित्यनिर्मिती करताना समाजोपयोगी आणि संशोधनाधिष्ठित साहित्याला प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि महात्मा जोतिराव फुले चरित्र-साधने प्रकाशन समितीची आढावा बैठक मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ येथे झाली. उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर आणि दोन्ही समित्यांचे सदस्य यावेळी उपस्थित होते.

अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याला महाराष्ट्रासह देशभरातून मोठी मागणी आहे. सध्या त्यांच्या साहित्याचे खंड उपलब्ध नसल्याने पुनर्मुद्रणाची आवश्यकता असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याच्या पुनर्प्रकाशनास गती देऊन प्रकाशित झालेल्या सातही खंडांचे पुनर्मुद्रण करून त्यांचे नव्याने प्रकाशन करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या कथा, कादंबऱ्या आणि इतर वाङ्मयावर आधारित स्वतंत्र स्वरूपातील दहा ग्रंथांचे प्रकाशन त्यांच्या १०७ व्या जयंतीनिमित्त दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यासही मान्यता देण्यात आली.

मुंबई विद्यापीठाच्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्राने गेल्या पाच वर्षांत अण्णाभाऊ साठे यांच्या संपूर्ण साहित्याच्या एकूण ६५ ग्रंथांचे भाषांतर पूर्ण केले आहे. यामध्ये मराठीतून गुजरातीमध्ये १५, हिंदीमध्ये १५, इंग्रजीमध्ये ३१, इंग्रजीतून रशियनमध्ये ३ आणि मराठीतून तमीळमध्ये २ ग्रंथांचे भाषांतर करण्यात आले आहे. हे भाषांतरित साहित्य देशभर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभावीपणे पोहोचावे, यासाठी संबंधित भाषांतील नामांकित प्रकाशकांमार्फत उच्च दर्जाच्या छपाईसह त्यांचे प्रकाशन करण्याबाबतही बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.

महात्मा जोतिराव फुले आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या वैचारिक वाङ्मयाचा व्यापक प्रसार करून नव्या पिढीपर्यंत त्यांचे विचार प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी आवश्यक आहे. त्यासाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि महात्मा जोतिराव फुले यांच्या साहित्याचे पुनर्मुद्रण, नवीन साहित्यनिर्मिती, भाषांतरे, प्रकाशन या उपक्रमांना गती देण्यात येणार मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.

0000

काशीबाई थोरात/विसंअ

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp