
बीड, दि. १: मराठवाड्याची भूमी ही संतांची, महंतांची, शूरांची, वीरांची, बुद्धीवंतांची आणि कर्तृत्ववान सुपुत्रांची भूमी आहे. या भूमीला धैर्याचा, शौर्याचा, संघर्षाचा वारसा आहे. संत गोरोबाकाकांच्या पवित्र तेर नगरीत माझा जन्म झाल्यामुळे माझे या भूमीशी एक अतूट नातं आहे. मराठवाड्याची लेक म्हणून या मातीतल्या संस्कारांचा आणि वारशाचा मला अत्यंत अभिमान आहे. आपण सर्वजण एकत्र येऊन विकसित, सक्षम आणि आत्मनिर्भर बीड जिल्हा घडवण्याचा संकल्प करूया, असे प्रतिपादन राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांनी केले.
बीड येथील मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा आज श्रीमती पवार यांच्या हस्ते येथील पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितिन रहमान, पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांची प्रमुख उपस्थिती होती.

उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री श्रीमती पवार म्हणाल्या की, जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांना गती देण्यात आली आहे. बीड विमानतळ विकास प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. युवकांना तंत्रज्ञानाधारित शिक्षण आणि कौशल्य मिळावे यासाठी ‘टाटा टेक्नॉलॉजी’च्या सहकार्याने ‘एमआयडीसी’त सुमारे 197 कोटी रुपयांचा ‘सी-ट्रिपल आयटी’ प्रकल्प उभारण्यात येत आहे. याचे काम प्रगतीपथावर असून जिल्ह्यातल्या सात हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. उदयोन्मुख खेळाडूंसाठी क्रीडा संकुलातल्या सुविधांचा विकास करत 25 कोटी रुपयांची विकासकामे करण्यात आली आहेत. येत्या जुलै 2026 मध्ये ‘स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा’ सुध्दा होणार असून, यामुळे राज्यातील खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी आणि पुढील पातळीवर झेप घेण्यासाठी मोठी संधी उपलब्ध होणार आहे.

‘बीड-अहिल्यानगर-परळी वैजनाथ’ रेल्वे मार्गाच्या उर्वरित कामांसाठी सुध्दा निधी मंजूर करण्यात आला असून हा महत्त्वाचा दळणवळण प्रकल्प लवकरच पूर्णत्वास नेण्याचा आपला संकल्प आहे. ‘एमआरआय’ सुविधा, माता-बाल संगोपन सेवा आणि इतर आधुनिक आरोग्य सुविधा यामुळे बीड जिल्हा आरोग्यदृष्ट्या अधिक सक्षम होत आहे. ‘सर्वांसाठी घरे’ या उपक्रमांतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेत बीड जिल्ह्याने अत्यंत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. राज्यात घरकुले पूर्ण करण्यामध्ये बीड जिल्ह्याने द्वितीय क्रमांक मिळवला आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी नियोजन विभागाने जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण), सन 2026-27 अंतर्गत जिल्ह्याकरिता 623 कोटींचा आराखडा मंजूर केला आहे. आरोग्य, शिक्षण, महिला व बालविकास या क्षेत्रांसाठी जिल्हा नियोजन योजनेत मोठ्या प्रमाणावर तरतूद करण्यात आली आहे. म्हणजे दि. 1 मे ते दि. 15 मे 2026 या कालावधीत वेबपोर्टवर जाऊन ‘स्व-गणना’ करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. प्रत्येक कुटुंबाने संकेतस्थळावर जाऊन स्वतःची माहिती नोंदवावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
‘शिव-शाहू-फुले-आंबेडकरां’च्या विचारांवरच राज्य सरकारचे काम सुरु आहे, यापुढे सुध्दा ते सुरु राहील, हा शब्द या निमित्ताने राज्यातल्या जनतेला यावेळी त्यांनी दिला. शेती, उद्योग, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण या सर्व क्षेत्रांत समतोल आणि शाश्वत विकास साधत बीड जिल्ह्याला महाराष्ट्रातील अग्रगण्य जिल्हा बनवूया. त्यासाठी आपण सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
जिल्ह्याने ‘महाराष्ट्र राज्य सेवा हक्क’ अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीत उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात आदर्श निर्माण केला आहे. जिल्हाधिकारी श्री. विवेक जॉन्सन यांच्या नेतृत्वाखाली 90.13 टक्के सेवा निर्धारित कालावधीत देत कार्यक्षमतेचा उच्चांक गाठला आहे. या कामगिरीबद्दल आपल्या जिल्हाधिकाऱ्यांचा राज्याच्या मुख्य सचिवांच्या हस्ते दोन दिवसांपूर्वी मुंबईत विशेष सन्मान करण्यात आला हा आपल्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. असे सांगून त्यांनी महाराष्ट्र दिनाच्या, कामगार दिनाच्या आणि बुध्द पौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छाही जनतेला दिल्या. ध्वजारोहणानंतर पोलीस दलाचे शानदार संचलन झाले. उत्कृष्ट काम केल्याबद्दल राज्यस्तरीय उत्कृष्ट पोलिस पाटील पुरस्काराने ज्ञानोबा मुंडे यांचा यशोचित सन्मान करण्यात आला. तसेच पोलीस, गृहरक्षक दल, पोलिस बँड पथक, एआय सर्वेलन्स वाहन, अग्निशामक दल, रुग्णवाहिका यांच्या पथकाने यावेळी मानवंदना दिली. त्यानंतर विविध क्षेत्रातील पुरस्कार विजेते आणि जिल्हा पुरस्कार विजेते, महासंचालक यांचे पोलिस पदक प्राप्त पोलिसांचा मंत्रिमहोदयांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
००००
