
- महाराजस्व अभियानातून नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक
- खारतळेगाव येथील पाणंद रस्त्याची पाहणी
अमरावती, दि.१६ : ‘मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजना’ ही शेतकऱ्यांना नवसंजीवनी देणारी योजना असून याद्वारे शेतकऱ्यांना शेत मशागतीसाठी व शेत मालाची ने-आण करण्यासाठी बारामाही रस्ता उपलब्ध करुन दिला जातो. यानुषंगाने जिल्ह्यातील सर्व पाणंद रस्त्यांचे उद्दिष्ट पूर्ततेसाठी प्रभावी नियोजन करुन येत्या खरिप हंगामासाठी शेतकऱ्यांना पाणंद रस्ते उपलब्ध करुन द्यावे, असे निर्देश महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित कार्यान्वयन यंत्रणांना आज दिले.

दर्यापूर उपविभागीय कार्यालय येथे आयोजित बैठकीत पालकमंत्री बावनकुळे यांनी दर्यापूर व अंजनगाव सुर्जी तालुक्यातील महसूल कामकाजांचा आज आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार राजेश वानखडे, आमदार गजानन लवटे, आमदार प्रवीण तायडे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी, माजी आमदार श्री. बुंदीले यांच्यासह शासकीय विभागाचे वरिष्ठ अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.

प्रारंभी पालकमंत्री बावनकुळे यांनी तहसील कार्यालय येथे आयोजित जनता दरबारात सामान्य नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या, महसूल विभागाशी संबंधीत प्रश्न, तक्रारी जाणून घेतल्या. यावेळी नागरिकांकडून प्राप्त 85 निवेदने स्विकारुन त्यावर तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

पालकमंत्री बावनकुळे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान योजनेअंतर्गत प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी विशेष समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात येत असून त्यामाध्यमातून सामान्य नागरिकांचे महसूल व अन्य महत्वाच्या विभागाशी निगडीत प्रश्न व तक्रारी एकाच जागेवरच सोडविण्यात येत आहे. सामान्य नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या, महसूल विभागाशी संबंधीत प्रकरणांचा निपटारा करण्यात येत आहे. नागरिकांनीही या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

पालकमंत्र्यांनी दर्यापूर व अंजनगाव सुर्जी तालुक्याचा महसूल कामांचा सविस्तर आढावा संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच अन्य यंत्रणांचे प्रमुख यांच्याकडून घेतला. यानुषंगाने निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करणे, मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजना, अकृषक परवानगी, सनद तसेच अकृषक आकारणी बदं करणे, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियान टप्पा क्रमांक एक अंमलबजावणी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महसूली तंटामुक्त गाव अभियान, ई-पीक पाहणी, ई फेरफार, जिवंत 7/12 मोहिम आदी महत्वाच्या बाबीं संदर्भात पालकमंत्र्यांनी दर्यापूर व अंजनगाव सुर्जी तालुक्याचा आढावा घेतला. उपरोक्त सर्व महत्वाच्या योजनांच्या संदर्भात नियोजित व प्रस्तावित कामे विहित कालमर्यादेत पूर्ण झाली पाहिजे, असे निर्देश त्यांनी कार्यान्वयन यंत्रणांना यावेळी दिले.

दि. 3 नोव्हेंबर 2025 च्या शासन अधिसूचनेनुसार जनतेची मागणी लक्षात घेऊन अनाधिकृत तुकडा / गुठ्यांची मानीव नियमितीकरण करण्याची सुलभ कार्यपध्दती तयार केलेली आहे. तुकडे बंदी विषयक 7/12 अभिलेखात नोंदी घेणे आणि तुकडे बंदीमुळे नोंदणीकृत न झालेले व्यवहाराचे खरेदीदस्त नोंदविणे यानुषंगाने तरतूदी करण्यात आलेल्या आहे. त्यानुसार पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देऊन तालुक्यातील सर्व प्रकरणे निकाली काढावीत, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
दर्यापूर व अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, पाणी टंचाई उपाययोजना, जलसंधारणाची कामे, जलसंचयन उपाययोजना, कृषी विभाग, महिला व बालविकास विभाग, वीज पुरवठा आदी शासकीय विभागांचा प्रलंबित व नियोजित कामे याबाबत सविस्तर आढावा पालकमंत्र्यांनी यावेळी घेतला.
खारतळेगाव येथील पाणंद रस्त्याची पाहणी
दर्यापूर दौऱ्यादरम्यान पालकमंत्री बावनकुळे यांनी मुख्यमंत्री बळीराजा पाणंद योजने अंतर्गत भातकुली तालुक्यातील खारतळेगाव येथे तयार करण्यात आलेल्या पाणंद रस्त्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन रस्त्याच्या कामाची पाहणी केली. यावेळी आमदार राजेश वानखडे, गजानन लवटे यांच्यासह महसूल, कृषी, भुमी अभिलेख विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

०००
