
यवतमाळ, दि.१६ : नागरिकांच्या समस्यांकडे होणारे दुर्लक्ष सहन केले जाणार नाही, नागरिकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याचे निर्देश असे पालकमंत्री संजय राठोड यांनी अधिकाऱ्यांना दिले.
दिग्रस, दारव्हा आणि नेर तालुक्यातील नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने सादर केलेल्या निवेदन व तक्रारींच्या अनुषंगाने विभागाने केलेल्या कार्यवाहीबाबत दिग्रस येथील राजेश्वर मंगल कार्यालय, दारव्हा आणि नेर येथील शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकांमध्ये नागरिकांच्या विविध समस्यांवर संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून अनेक प्रश्न मार्गी लावण्यात आले. तसेच प्रलंबित प्रकरणांचा निपटारा तातडीने करून नागरिकांना दिलासा देण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या .
तसेच कामातील अनावश्यक विलंब आणि नागरिकांच्या समस्यांकडे होणारे दुर्लक्ष यापुढे सहन केले जाणार नाही. नागरिकांची कोणतीही तक्रार प्रलंबित राहू नये तसेच प्रत्येक प्रकरण संवेदनशीलतेने आणि तातडीने हाताळले जावे, असे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
तक्रारी जागेवर निकाली
यावेळी पालकमंत्री राठोड यांनी काही महत्त्वाच्या विषयांवर थेट मंत्रालयातील सचिवांना संपर्क साधून नागरिकांचे प्रश्न ‘ऑन दि स्पॅाट’ निकाली काढले. या धडक कार्यवाहीमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
०००
