Pune | Sat, 16 May 2026

Ad

महात्मा फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त सेंद्रीय शेतीचा उपक्रम -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Sunil Goyal | 1 views
महात्मा फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त सेंद्रीय शेतीचा उपक्रम -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

अमरावती, दि. १६ (जिमाका): रासायनिक शेतीकडून सेंद्रीय शेतीकडे शेतकऱ्यांना वळविण्यासाठी व्यापक मोहिम हाती घेण्यात येणार आहे. ही मोहिम महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200 व्या जयंतीनिमित्त राबविण्यात येणार आहे. पहिल्या वर्षात सुमारे एक हजार हेक्टर सेंद्रीय शेतीखाली आणण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे जनमत तयार करण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी व्यापक जनजागृतीची मोहिम हाती घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

पालकमंत्री बावनकुळे यांच्या उपस्थितीत आज जिल्हास्तरीय खरीप हंगाम 2026 ची नियोजन बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी कै. वसंतराव नाईक स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे, खासदार बळवंत वानखेडे, अमर काळे, विभागीय आयुक्त नयना गुंडे, आमदार संजय खोडके, रवी राणा, केवलराम काळे, प्रताप अडसड, प्रविण तायडे, राजेश वानखेडे, उमेश यावलकर, गजानन लवटे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, मनपा आयुक्त वर्षा लढ्ढा, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी, जिल्हा पोलिस अधीक्षक निकेतन कदम उपस्थित होते.

मंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे. देशस्तरावर सेंद्रिय शेतीबाबत जनमत तयार करण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. सुरवातीला उत्पादकता कमी होत असली तरी रासायनिक खतांचा खर्च कमी होत असल्याने आणि शेतमालाला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे कृषी विभागाने कृषी सहायकापासून तालुका कृषी अधिकारी स्तरापर्यंत उद्दीष्ट देऊन जिल्ह्यात सेंद्रीय शेतीबाबत सकारात्मक वातावरण तयार करावे. सेंद्रीय शेतीमुळे शेतकऱ्यांची रासायनिक खतांवरील अवलंबितता कमी होण्यास मदत मिळणार आहे.

खरीप हंगामाच्या सुरवातीला शेतकऱ्यांकडून कृषी निविष्ठांमध्ये लिंकिंगच्या तक्रारी करण्यात येत आहे. त्यामुळे कंपनी किवा स्थानिक विक्रेत्यांच्या स्तरावर लिंकिंग होणार नाही, यासाठी कृषि विभागाने भरारी पथकामार्फत कारवाई करावी. आवश्यकता भासल्यास विक्रेता आणि कंपनीवर गुन्हे दाखल करण्यात यावे. कोणत्याही परिस्थितीत लिंकिंगचा शेतकऱ्यांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी. येत्या काळात दुकानात लिंकिंगचे साहित्य ठेवता येणार नाही. त्यामुळे लिंकिंगवर अंकुश ठेवण्यास मदत होणार आहे. तसेच शेतकऱ्यांना आवश्यक खते उपलब्ध व्हावेत, यासाठी प्रयत्न करण्यात यावे. यासोबतच प्रतिबंधित बियाणे जिल्ह्यात विक्री होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी बँकांना ताकिद देण्यात यावी. खरीपासाठी 1650 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात येणार आहे. प्रामुख्याने राष्ट्रीयकृत आणि खासगी बँकांनी कर्ज वाटप करावे यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. कृषि कर्जवाटप करण्यासाठी बँकांना कॅम्प लावण्यासाठी सूचना करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

अल नीनोच्या प्रभावामुळे जलसाठे प्रभावित होणार असल्याने जिल्ह्यात प्रामुख्याने जलसंधारणाची कामे प्राधान्याने करण्यात येणार आहे. प्रामुख्याने जलसंधारण आणि जलसंपदा विभागावर पाणी साठविण्याची जबाबदारी राहणार असल्याने याचे नियोजन करण्यात यावे. नाले आणि तलावातून गाळ काढण्यासाठी पुढाकार घेवून पाणी साठविण्यासाठी नियोजन करण्यात यावे. त्यासोबतच रिचार्ज शाफ्टची कामे हाती घेण्यात यावे. यासाठी सीएसआरचा निधी उपलब्ध करून कामे करण्यात यावी. जिल्ह्यात पांदण रस्त्यांबाबत चांगले काम करण्यात येत आहे. जिल्हा नियोजन आणि मातोश्री योजना मिळून पांदण रस्यासाठी निधी मिळत आहे. यासर्व निधीचा चांगली उपयोग करण्यात यावा. या कामांना लोकप्रतिनिधींनी भेटी द्याव्यात. या रस्त्याच्या कडेला वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची नोंदणी करावी. चारा उपलब्ध होण्यासाठी बचतगटांना महसूली जागा देऊन याठिकाणी चारा निर्मितीसाठी प्रयत्न करण्यात यावे, अशा सूचना पालिकमंत्री बावनकुळे यांनी दिले.

०००

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp