Pune | Thu, 14 May 2026

Ad

सोमनाथ ‘स्वाभिमान पर्व’: श्रद्धेच्या विजयाची आणि भारताच्या सांस्कृतिक पुनरुत्थानाची १००० वर्षे 

Sunil Goyal | 1 views
सोमनाथ ‘स्वाभिमान पर्व’: श्रद्धेच्या विजयाची आणि भारताच्या सांस्कृतिक पुनरुत्थानाची १००० वर्षे 

भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर, जिथे अथांग अरबी समुद्र भगवान शिवाच्या चरणांचे प्रक्षालन करतो, तिथे उभे असलेले प्रभास पाटनचे सोमनाथ मंदिर केवळ एक वास्तू नाही, तर ते भारताच्या अजेय आत्मसन्मानाचे जिवंत प्रतीक आहे. शिवपुराणात उल्लेखिलेल्या द्वादश ज्योतिर्लिंगांमधील प्रथम स्थान म्हणून सोमनाथाचे महत्व अनन्यसाधारण आहे. परंतु, आज जेव्हा आपण २०२६ या वर्षात पदार्पण केले आहे, तेव्हा हे मंदिर एका ऐतिहासिक कालखंडाचे साक्षीदार म्हणून आपल्यासमोर उभे आहे.

हे वर्ष भारताच्या सांस्कृतिक इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले आहे. या वर्षाचे महत्व दोन प्रमुख कारणांसाठी आहे. जानेवारी १०२६ मध्ये आक्रमक महमूद गजनीने सोमनाथ मंदिरावर पहिले भीषण आक्रमण केले होते. या घटनेला या वर्षात १००० वर्षे पूर्ण होत आहेत. हे पर्व त्या सर्व वीर आत्मबलिदानांचे स्मरण करण्याचे निमित्त आहे, ज्यांनी या मंदिराच्या रक्षणासाठी आणि अस्मितेसाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. तसेच मे १९५१ मध्ये स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते नूतन सोमनाथ मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली होती. या ऐतिहासिक घटनेला २०२६ मध्ये ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. म्हणजेच, हे वर्ष सोमनाथ मंदिराच्या ‘अमृत महोत्सवा’चेही आहे.

शतकानुशतके परकीय आक्रमकांनी या मंदिराला लुटले, त्याची मोडतोड केली. त्यांचा उद्देश केवळ संपत्ती लुटणे हा नव्हता, तर भारताचा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कणा मोडणे हा होता. परंतु, प्रत्येक आक्रमणाने भक्तांची श्रद्धा अधिकच दृढ झाली. जितक्या वेळा हे मंदिर पाडले गेले, तितक्याच जोमाने भारतीयांनी पुन्हा त्याची उभारणी केली.

स्वातंत्र्यानंतर लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी सोमनाथच्या पुनर्बांधणीचा जो संकल्प सोडला, तो केवळ एका मंदिराचा जीर्णोद्धार नव्हता, तर तो गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त होणाऱ्या भारताचा उद्घोष होता. सरदार पटेलांचा हाच वारसा पुढे नेण्याचे कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली होत आहे.

सोमनाथ हे केवळ शिवाचे धाम नाही, तर ते भगवान श्रीकृष्ण आणि शक्तीच्या उपासनेचेही पावन स्थान आहे. हे मंदिर प्राचीन काळापासून भारताचे आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र राहिले आहे. येथील ‘स्वाभिमान पर्वा’चा उद्देश आपल्या गौरवशाली वारशाची ओळख नव्या पिढीला करून देणे हा आहे. ‘स्वाभिमान पर्व’ हे केवळ उत्सवाचे साधन नसून, ते आपल्या सामूहिक संकल्पाचे प्रतीक आहे.

सोमनाथ मंदिराची कथा ही विजयाची कथा आहे. अन्यायावर न्यायाच्या, विनाशावर सृजनाच्या आणि अंधारावर प्रकाशाच्या विजयाची. १०२६ मधील त्या काळरात्रीपासून सुरू झालेला हा प्रवास आज २०२६ मध्ये एका वैभवशाली भारताच्या उदयापर्यंत येऊन पोहोचला आहे. सोमनाथचा हा जिर्णोद्धार जगाला सांगतो की, भारत आता केवळ स्वतंत्र झालेला देश नाही, तर तो आपली प्राचीन ओळख आणि वैभव पुन्हा प्राप्त करणारा ‘विश्वगुरु’ बनण्याच्या मार्गावर असलेले राष्ट्र आहे.

या ‘स्वाभिमान पर्वा’च्या निमित्ताने आपण सर्वजण या पवित्र भूमीला नमन करूया आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी व संस्कृतीच्या रक्षणासाठी कटिबद्ध होऊया.

000000
ॲड. आकाश फुंडकर, कामगार मंत्री, महाराष्ट्र राज्य.

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp