Pune | Sat, 27 June 2026

Ad

डॉ. जयसिंगराव पवार यांच्या विचारांचा व कर्तृत्वाचा आदर्श घेऊया – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

Sunil Goyal | 2 views
डॉ. जयसिंगराव पवार यांच्या विचारांचा व कर्तृत्वाचा आदर्श घेऊया – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

  • अहर्निश इतिहास संशोधक दिवंगत डॉ. जयसिंगराव पवार यांना ४० वा राजर्षी शाहू पुरस्कार मरणोत्तर प्रदान
  • शाहू स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

कोल्हापूर, दि. २६ : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे पुरोगामी विचार राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविणारे ज्येष्ठ अहर्निश इतिहास संशोधक दिवंगत डॉ. जयसिंगराव पवार यांना राजर्षी शाहू महाराजांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त ४० वा ‘राजर्षी शाहू पुरस्कार-२०२६’ मरणोत्तर प्रदान करण्यात आला. त्यांच्या वतीने हा पुरस्कार त्यांच्या पत्नी वसुधा पवार यांनी स्वीकारला.

राजर्षी शाहू स्मारक येथे राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट, कोल्हापूरच्या वतीने आयोजित या सोहळ्यात डॉ. पवार यांच्या ऐतिहासिक ज्ञानसाधनेचा आणि महाराष्ट्राच्या इतिहास संशोधन क्षेत्रातील त्यांच्या दैदिप्यमान योगदानाचा कृतज्ञतापूर्वक गौरव करण्यात आला. एक लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते आणि खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, विश्वस्त तथा कुलगुरू डॉ. राजनीश कामत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, ट्रस्टचे प्रशासन अधिकारी राजदीप सुर्वे, तसेच प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव उपस्थित होते.

डॉ. पवार यांच्या विचारांचा व कर्तृत्वाचा आदर्श घेऊया – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, डॉ. जयसिंगराव पवार यांनी इतिहास संशोधन क्षेत्रात केलेले कार्य अत्यंत मोलाचे असून, त्यांच्या विचारांचा आणि कर्तृत्वाचा आदर्श आजच्या पिढीने घ्यावा. ४० व्या राजर्षी शाहू पुरस्काराने त्यांचा गौरव होणे, हे कोल्हापूरच्या सुपुत्रासाठी अभिमानास्पद आहे. आत्तापर्यंत पुरस्कार प्राप्त महान व्यक्तींच्या पंक्तीत त्यांचे आज नाव जोडले गेले. त्यांच्या संशोधन कार्यामागे मोलाची साथ देणाऱ्या कुटुंबीयांचेही त्यांनी विशेष अभिनंदन केले.

खरा इतिहास मांडणारे संशोधक म्हणजे डॉ. पवार – खासदार शाहू छत्रपती

खासदार शाहू छत्रपती महाराज म्हणाले, डॉ. जयसिंगराव पवार यांचे संशोधन देश-विदेशात मान्यता पावले असून त्यांच्या संशोधनाचा अधिकृत संदर्भ म्हणून वापर केला जातो. खरा आणि वस्तुनिष्ठ इतिहास मांडणारे ते अभ्यासू संशोधक होते. डॉ. पवार यांच्यासोबत काम करताना लाभलेल्या त्यांच्या मार्गदर्शनाच्या आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला.

शाहू स्मरणिकेचे प्रकाशन

समाजप्रबोधनाच्या उद्देशाने राजर्षी शाहू महाराज यांचे जीवन व कार्य यांचे विवेचन करणाऱ्या ‘शाहू स्मरणिका’चे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या स्मरणिकेचे संपादन आणि निर्मितीचे कार्य डॉ. जयसिंगराव पवार यांनी केले होते. हे काम अंतिम टप्प्यात असतानाच त्यांचे निधन झाले. स्मरणिकेत विविध नामवंत विचारवंतांचे राजर्षी शाहू महाराजांवरील लेख समाविष्ट करण्यात आले असून ती ट्रस्ट कार्यालयात विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. पवार यांच्या कन्या डॉ. मंजुश्री पवार यांनी सत्कारमूर्तींच्या वतीने मनोगत व्यक्त केले. त्यांनी वडिलांच्या संशोधन कार्याचा आढावा घेत ट्रस्टचे आभार मानले. प्रास्ताविकात जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी पुरस्काराचे स्वरूप स्पष्ट करून ट्रस्टसाठी सलग १५ वर्ष डॉ. पवार यांनी दिलेल्या योगदानाचा गौरव केला. डॉ. चौसाळकर यांनी डॉ. पवार यांच्या बाबत बोलताना संशोधन कार्यातील विविध घटना व त्यांच्या सोबत केलेल्या कामाचे अनुभव मांडले. सत्कारमूर्तींच्या सन्मानपत्राचे वाचन निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी पोलीस बँडतर्फे मान्यवरांना मानवंदना देण्यात आली तसेच राजर्षी शाहू महाराजांच्या गौरवगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. स्वागत गजानन गुरव यांनी केले. सूत्रसंचालन पंडित कंदले यांनी, तर आभार प्रदर्शन राजदीप सुर्वे यांनी केले. या कार्यक्रमाला असंख्य जेष्ठ, तरुण शाहूप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नूतनीकरण झाल्यानंतर हा शाहू स्मारक भवन येथील पहिलाच ऐतिहासिक सोहळा ठरला.

०००

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp