
सांगली, दि. २६ (जिमाका) : राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत थकीत शेती कर्जाची माहिती शासनाच्या पोर्टलवर भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. सांगली जिल्ह्यातील सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बँक आणि व्यापारी बँकेकडील थकबाकीदार कर्जदार असलेल्या मयत शेतकऱ्यांच्या वारसांनी विकास सोसायटी व संबंधित कर्ज घेतलेल्या बँकेत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष व जिल्हा उपनिबंधक सुनील चव्हाण यांनी केले आहे.
याबाबत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे कि, मयत शेतकऱ्यांच्या वारसांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याबरोबरच अद्याप ज्या शेतकऱ्यांनी अॅग्रीस्टॅक रजिस्ट्रेशन केले नाही, त्यांनी देखील आपल्या गावातील ग्रामपंचायत येथे रजिस्ट्रेशन करून घेऊन सदर रजिस्ट्रेशन नंबर संबंधित विकास सोसायटी व बँक यांना देण्यात यावे. कामानिमित्त परगावी असणाऱ्या मात्र आधार कार्ड विकास सोसायटी यांच्याकडे दिलेले नाही, अशा विकास सोसायटीच्या सभासदांनी देखील त्यांचे आधार कार्ड विकास सोसायटीमध्ये जमा करावे, असे पत्रकात म्हटले आहे.
मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी आधारकार्ड, वारसांचे संमती प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रांसह संबंधित प्राथमिक विकास संस्था अथवा बँकेच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधावा. कर्जमाफी योजनेचा लाभ मिळविण्यासाठी शासनाने निश्चित केलेल्या प्रक्रियेची पूर्तता करणे आवश्यक असून, त्यासाठी वारसांची माहिती व कागदपत्रे वेळेत सादर होणे गरजेचे आहे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न झाल्यास संबंधित लाभार्थी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहू शकतात. कागदपत्राची पुर्तता वेळेत न झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित वारसांची राहील. त्यामुळे कर्जमाफीचा लाभ मिळविण्यास पात्र ठरलेल्या मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी, आधार कार्ड न दिलेल्यांनी, व अॅग्री स्टॅक रजिस्ट्रेशन न केलेल्यांनी विलंब न करता संबंधित विकास सोसायटी व बँकांशी संपर्क साधून आवश्यक ती कागदपत्रे जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन पत्रकात केले आहे.
०००
