Pune | Thu, 14 May 2026

Ad

कयाधू नदी स्वच्छता मोहिमेचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते उद्घाटन

Sunil Goyal | 8 views
कयाधू नदी स्वच्छता मोहिमेचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते उद्घाटन

हिंगोली, दि. १: हिंगोली शहराची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या कयाधू नदीच्या स्वच्छता, संवर्धन व सुशोभीकरणासाठी जिल्हा प्रशासन व नगरपरिषद हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने हाती घेण्यात आलेल्या विशेष स्वच्छता मोहिमेचे उद्घाटन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते आज करण्यात आले. नदी परिसरात आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत मोहिमेला उत्साहपूर्ण प्रारंभ झाला.

यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, नगराध्यक्षा श्रीमती रेखाताई बांगर, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, स्वयंसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी कयाधू नदी पात्राची पाहणी करून स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ केला. यानंतर नदीपात्रातील गाळ, प्लास्टिक कचरा, निर्माल्य, झुडपे व अन्य घनकचरा हटविण्याच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली. या मोहिमेत यंत्रसामग्रीबरोबरच मानवी श्रमदानालाही प्राधान्य देण्यात आले असून विविध स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांचा सक्रिय सहभाग नोंदविण्यात येत आहे.

यावेळी बोलताना पालकमंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले की, कयाधू नदी ही केवळ हिंगोली शहराची नैसर्गिक जलवाहिनी नसून शहराच्या पर्यावरणीय समतोलाची प्रमुख आधाररेषा आहे. वाढते शहरीकरण, अनियंत्रित कचरा टाकणे आणि नदीपात्रातील अतिक्रमण यामुळे नदीचे अस्तित्व धोक्यात येत आहे. नदी स्वच्छ आणि प्रवाही ठेवणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे सामाजिक कर्तव्य आहे. कयाधू नदी स्वच्छता मोहीम ही केवळ एकदिवसीय उपक्रम नसून नदी संवर्धनाचे लोकआंदोलन बनले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp